दबंग चित्रपटातील ‘थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है!’ हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत वाढलेला संशय कल्लोळ! विरोधी पक्षांच्या पुढारी कार्यकर्त्यांवर विश्वास मात्र स्व-पक्षाबाबत संशय असाच प्रकार या निवडणुकीत सुरू आहे. त्यामुळे आपल्याच लोकांकडून धोका होणार या भयाने सर्वच राजकीय पक्षांना पछाडले आहे. काँग्रेसला मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून, शिवसेनेला भाजपकडून, एमआयएमला वंचित आघाडीकडून तर शिव स्वराज्य पक्षाला आपलेच नेते धोका देतील, अशा अनामिक भीतीने त्रस्त केलंय. राजकारण म्हणजे धोका... धोका अन धोकाच... यापेक्षा वेगळे नाही ! या धोक्यातून ज्याची धुकधूक कायम राहते तोच टिकला !
यावेळी चौरंगी लढत होत आहे. नेहमी काँग्रेस -शिवसेनेत होणारी लढत यंदा बहुरंगी अवस्थेत पोहोचली. त्यामुळे कुणाचा कुणाला पायपोस उरला नाही. शिवसेनेचे मावळे काहीही ऐकायला तयार नाहीत. काँग्रेसचे निष्ठावान घराबाहेर पडायला तयार नाहीत. एमआयएममध्ये बेकी झालीये. शिव स्वराज्य पक्षाला नेतेच मिळेनासे झालेत. अशा परिस्थितीत मतदारांना मतदारांच्या भरवशावर सोडून अनेकांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले. औरंगाबाद मतदार संघात नको तेवढी शांतता दिसून येते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची आहे. आठवडाभरात तुफान येऊ शकते. या वादळाने सर्वच पक्ष हादरून जातील. अंतर्गत कलह बेबनाव एवढा वाढला आहे की शिवसेना, काँग्रेस, एमआयएम या तीनही पक्षांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ज्यांना आतापर्यंत राजकीय संधी गवसत नव्हती, अशांनी बंड करण्याचे ठरवले तर त्यात चुकीचे काहीच नाही. गेल्या दोन दशकात कोणत्याही राजकीय पक्षांने नव्या नेतृत्वाला संधी दिली नाही. त्याची किंमत सर्वच पक्षांना यावेळी चुकवावी लागेल असे दिसते. मतदारांनी ठाम मत बनवले आहेच. हळूहळू अनेकांची मते बनत आहेत. सामाजिक समीकरणे एवढ्या वेगाने बदलत आहे की त्याचा सुगावा भल्याभल्या राजकीय पंडितांनाही लागणार नाही. राजकीय विश्वासार्हता लयास गेल्याने सर्व पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते संशयाच्या नजरेने बघताना दिसतात. आपल्याच कार्यकर्त्यांत्यांवर संशय व्यक्त होत असल्याने स्थिती अवघड बनली. एक वेळ विरोधी पक्षाचे कार्यकर्ते इमानदारीने काम करतील मात्र आपलेच लोक पाठीत खंजीर खुपसतील असेही उघडपणे बोलले जाते. त्यामुळेच उमेदवारांना प्रचारापेक्षाही अधिक ताकत आणि आर्थिक बळ नाराज आणि कार्यकर्त्यांवर नजरा ठेवण्यासाठी खर्च करावे लागत आहे. शहरातच अशी स्थिती नाही तर ग्रामीण भागातही फितुरी रोखण्यासाठी मोठा लवाजमा तयार ठेवण्याची वेळ सर्वच पक्षांवर आली आहे. येणार्या काळात संशय कल्लोळ अधिकच वाढणार आहे. या संशय कल्लोळाचा फटका प्रामाणिक आणि मेहनती कार्यकर्त्यांनाही सहन करावा लागेल. एकंदरीत मतदार संघाची स्थिती अतिशय रंजक बनली आहे. त्यामुळे ‘गैरोंसे डर नही लगता साहब, अपनोसे लगता है!’ असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली, एवढे मात्र नक्की !